बीडच्या गेवराई तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस, कापसाचं मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

गेवराई (Gevrai) तालुक्यात रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं कापसाचं (Cotton) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.


Beed Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीड (Beed) जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्यात रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं कापसाचं (Cotton) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापसाच्या शेतात गुडाघाभर पाणी साचल्यानं पिक पूर्णत: पाण्याखाली गेलं आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून बळीराजा संकटात सापडला आहे.


दिवाळीपूर्वीच सरकारनं तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा

बीड जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी गेवराई तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसानं कापसाच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पूर्ण कापूस पीक पाण्याखाली गेलं आहे. लाखो रुपये खर्च करुन शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगवलं होतं, त्यातच आठ दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळं कापसाची बोंड काळी पडली असून, त्यामधून काहीच उत्पन्न मिळणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळं दिवाळीपूर्वीच तत्काळ सरकारनं ओला दुष्काळ बीड जिल्ह्यात जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, वाशिम, पुणे या जिल्ह्यांना पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे.  यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आला आहे. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. या परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. सर्वात जास्त फटका सोयाबीन आणि कापूस पिकाला बसला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Comments